Narmada Parikrama : चिखली : नर्मदा मातेचे नामस्मरण, जलस्नान आणि पायी परिक्रमा यांचे आध्यात्मिक महत्त्व नर्मदा पुराणचे कथाकार मिलिंद महाराज चवंडके यांनी रसाळपणे उलगडले. परिक्रमेतील अनुभव कथन करताना अनेक भाविक भावविभोर झाले.

येथील जागृत हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा पुराण कथा निरूपण सोहळ्याचे सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हभप ज्योतीताई इंगळे यांनी गायिलेली स्वरचित आरती उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. भगवान शिंगणे व चंद्रकला शिंगणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
नर्मदेची पायी परिक्रमा करणे म्हणजे आजच्या काळातील कठोर तपश्चर्याच आहे. या परिक्रमेत श्रद्धा, संयम आणि त्यागाची कसोटी लागतेच; मात्र त्याचबरोबर जात-पात, धर्म-संप्रदाय व भाषेचे सर्व भेद बाजूला पडून सामाजिक समरसता व ऐक्याचे दर्शन घडते, असे मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले.
कार्यक्रमास वनिताताई जवंजाळ, बेबीताई राज, सुमनबाई चेके, शकुंतलाताई सोनुने, सखुबाई जाधव, विजयाताई हिंगे, विमलताई देशमुख, कासाबाई पवार, दुर्गाताई सावके, संध्याताई कपाळे, ज्योतीताई भुतेकर, मंदाताई भुतेकर, नयनाताई काळे, ज्योतीताई इंगळे, कमलताई जेवूघाले, उषाताई पाटील, अलकाताई रिंढे, नंदाताई भराड, रेखाताई इंगळे, चंद्रकलाताई टकले, प्रमिला बाहेकर, मीनाताई शिंदे, सुलोचना देशमुख, भागीरथी सोळुंके, आशाताई सोळुंके, प्रमोदिनी वडे, सुनीताताई लोखंडे, पार्वतीताई गाडेकर आदींसह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीड वाटी तांदळातही वनवासींची श्रीमंती!
नर्मदा परिक्रमेच्या तपश्चर्येचे खरे महत्त्व जंगलात राहणाऱ्या वनवासी बांधवांना कळते. घरात अवघी दीड वाटी तांदूळ असतानाही परिक्रमावासीयांना हाक मारून भोजन करून जाण्याचा आग्रह केला जातो. त्यांची ही भावना पाहून परिक्रमावासी मोठ्या मनाच्या दरिद्री कुटुंबाच्या श्रीमंतीने भारावून जातात, असे मिलिंद महाराजांनी सांगितले. नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून जात-पात, धर्म-संप्रदाय आणि भाषेचे भेद दूर होतात. त्यामुळे नर्मदा परिक्रमा ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक समरसतेचा आणि ऐक्याचा जिवंत अनुभव देणारी साधना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नर्मदा भक्तीचे महत्त्व उलगडले
नर्मदा परिक्रमा करणारे आणि नर्मदा जल प्राशन करणारे पुण्यात्मे होत. त्यांची वंशपरंपरा खंडित होत नाही. अमरकंटक पर्वताची श्रद्धेने परिक्रमा केल्यास पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य प्राप्त होते. नर्मदा-कावेरी संगमस्थळी स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते, तर पिप्पलेश्वर तीर्थी स्नान केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळून मरणोत्तर शिवलोक प्राप्त होतो, असे नर्मदा पुराणातील संदर्भ देत त्यांनी सांगितले. शूलभेद तीर्थात स्नान करून भगवान श्रीशंकराचे दर्शन घेतल्यास सात जन्मांपर्यंत निर्धन अथवा रोगी व्हावे लागत नाही. तसेच पित्याच्या कुळातील २१, मातृकुळातील २१ आणि धर्मपत्नीच्या कुटुंबातील १० पिढ्यांचा उद्धार होतो, अशी श्रद्धा नर्मदा पुराणात वर्णिल्याचे त्यांनी सांगितले.
‘नर्मदा’ नामस्मरणाचेही सांगितले माहात्म्य
श्रीनर्मदा स्तोत्राचे पठण दररोज प्रातःकाळी व झोपण्यापूर्वी केल्यास नर्मदा मातेचा आश्रय लाभतो. नर्मदेचे नाव ऐकल्याने एका जन्माचे दहा जन्मांचे, तर नर्मदा जलाने स्नान केल्याने तीस जन्मांचे पाप नष्ट होते, असे कैलास पर्वतावर नंदीने हनुमंताला सांगितल्याचा संदर्भही मिलिंद महाराजांनी दिला.
यज्ञाची दक्षिणा आनंदाने द्या; देवाच्या निधीचा गैरवापर महापाप !
‘यज्ञ विधीवत संपन्न झाल्यानंतर यज्ञाची दक्षिणा न देणाऱ्यांचा नाश होतो,’ असे श्री मार्कंडेय महामुनींनी नर्मदा पुराणातील ३३ व्या अध्यायात सांगितल्याचा संदर्भ देत, यज्ञाची दक्षिणा आनंदाने व भरभरून द्यावी, असे आवाहन मिलिंद महाराजांनी केले. ज्या देवाच्या नावाने लोकवर्गणी जमा केली जाते, त्याच देवाच्या कार्यासाठी ती खर्च करावी. तिचा अन्य कार्यासाठी वापर करणे हे महापाप असल्याचा कल्याणकारी सल्लाही त्यांनी दिला.
अनुभव कथनाने भाविक भावविभोर
मिलिंद महाराज चवंडके यांनी पायी नर्मदा परिक्रमेदरम्यान आलेले अनुभव रसाळ व भावपूर्ण शैलीत श्रोत्यांसमोर मांडले. त्यांचे अनुभव ऐकताना उपस्थित भाविकांचे डोळे अनेकदा पाणावले. विनायक लांडे, साहेबराव आहेर, दिगंबर आहेर व बंकटसिंग शिहरे यांनी नर्मदेची आरती गाऊन ठेक्यात भजन सादर केले. या भजनावर उपस्थित भाविकांनीही उत्स्फूर्तपणे ताल धरला.
