Yellow Alert : अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अहिल्यानगरसह पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड व कुकडी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. संबंधित धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या भागात परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नदी, ओढे व नाल्यांच्या काठावरील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरण परिसरात जाणाऱ्या पर्यटकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
वीज चमकताच झाडांचा आसरा टाळा
मेघगर्जना व विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडाजवळ थांबू नये. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिन्या व ट्रान्सफॉर्मरजवळ जाणे टाळावे. जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये.
घाट रस्त्यांवरील प्रवास टाळण्याचे आवाहन
अतिवृष्टीमुळे भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहून गरज भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास शक्यतो टाळावा, असे प्रशासनाने कळविले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे पोलीस स्टेशन अथवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक १०७७ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
पाऊस, वीज आणि वादळी वाऱ्याच्या काळात अनावश्यक घराबाहेर पडणे टाळा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. नदी-नाले, धरणे आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहून स्वतःसह जनावरांचीही सुरक्षितता सुनिश्चित करा.