Pulse Polio Vaccination Campaign : अहिल्यानगर : पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नागरदेवळे येथे रविवारी (ता. २८) उत्साहपूर्ण वातावरणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत सरपंच राम पानमळकर यांच्या हस्ते बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सकाळपासूनच पालकांनी आपल्या पाल्यांना लस देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. या वेळी पालकांना नियमित लसीकरणासोबतच प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाढे, डॉ. सुमैय्या पठाण यांनी केले.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, ग्रामपंचायत अधिकारी नेताजी भाबड, परिचारिका स्मिता गायकवाड, आरोग्य सेवक सचिन चितळे, विवेक गुंड, प्रशांत लोंढे, गटप्रवर्तक कल्पना शेंडे, महिला आरोग्य पर्यवेक्षिका सुनीता काळे तसेच आशा स्वयंसेविका सोनाली धाडगे, सुनीता कड आदी उपस्थित होते.

