Crime : महिलांवर अत्याचार हाेणाऱ्या घटनेत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. नुकतीच माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समाेर आली आहे. शेगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीला लॉजवर नेऊन अत्याचार करण्यात आला. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी आराेपीला तत्काळ अटक केली असून नराधमाला कठाेर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
या धक्कादायक घटनेने संपूर्ण शेगाव शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. नुकताच शेगावमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी आहे, अशातच एका नराधमाने शेगावमधील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका १९ वर्षीय मुलीला विश्वासात घेत लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर कुणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. पीडितेने तत्काळ पाेलीस ठाण्यात धाव घेत पाेलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून 80/2026, 64,74,351(2)बीएनएस यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी आकाश सोनाजी भामरे याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जात आहे.