Ganesh Purana : अहिल्यानगर : देवी पार्वतीच्या भक्तीतून मृत्तिकेचा गणपती सजीव झाला आणि तेव्हापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशपूजेची परंपरा सुरू झाली. गणेशमंत्राचे अनुष्ठान विघ्नांचा नाश करून भक्तांना इष्ट फल व आनंद देणारे आहे, असे मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा संयोजिका जयश्री पोटे यांच्या भिंगार येथील निवासस्थानी आयोजित प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते. प्रारंभी जयश्री पोटे यांनी मिलिंद महाराजांचे स्वागत केले. विहिंपचे विभाग मंत्री सुनीलराव खिस्ती व अशोक शहापुरे यांच्या हस्ते मिलिंद महाराज चवंडके यांचा सन्मान करण्यात आला.

मिलिंद महाराज म्हणाले, “देवाधिदेव महादेवांनी भृगूऋषींना गणपती मंत्राचे सामर्थ्य सांगताना सहा अक्षरी आणि एकाक्षरी गणपती मंत्र श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे. गणपती मंत्राचे अनुष्ठान केल्याने विघ्ने दूर होऊन इष्ट फल प्राप्त होते. गणेश सहस्रनामाचा जप इच्छापूर्तीचा आनंद देतो. भगवान शंकराने गणेश सहस्रनामाचा पाठ आणि एकाक्षरी मंत्राचा जप करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला. त्याच्या स्मरणार्थ दीपोत्सव साजरा केला जातो,” अशी आख्यायिका त्यांनी सांगितली.

