Ahilyanagar Farmers : अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर झाली असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी ४ हजार ४१५ शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४६ हजार ८५६ शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी यादी उपलब्ध झाली असून, त्यापैकी १ लाख ३३ हजार ५०५ शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
तिसऱ्या यादीतील ४ हजार ४१५ शेतकऱ्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ४७१, तर इतर बँकांच्या २ हजार ९४४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या दोन याद्यांमध्ये १ लाख ४२ हजार ४४१ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे तिन्ही याद्यांमधून आतापर्यंत एकूण १ लाख ४६ हजार ८५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणासाठीचे विवरण उपलब्ध झाले आहे.
नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि महापुरामुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे कठीण होते. परिणामी, थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार २१५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण १ हजार ११४ कोटी रुपये जमा झाले आहेत.
फार्मर आयडी, वारस नोंदी पूर्ण करण्याचे आवाहन
ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांना प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तो तातडीने काढावा. तसेच, मयत खातेदारांच्या खात्यांबाबत त्यांच्या वारसांनी संबंधित विकास संस्था किंवा बँकेकडे वारस नोंद करून घ्यावी. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.