Nagardevale : अहिल्यानगर : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर आज नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे अभियानांतर्गत गरोदर महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता सोनार यांनी केलेल्या तपासणीत ४५ गरोदर महिलांपैकी तीन महिला (हाय रिस्क) गर्भधारणेच्या असल्याचे निदान झाले. संबंधित महिलांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, त्यांना मोफत उपचार व आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

नागरदेवळे येथील आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभियानात गरोदर मातांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. गर्भावस्थेदरम्यान घ्यावयाची काळजी, संतुलित आहार, नियमित तपासणीचे महत्त्व आणि सुरक्षित प्रसूती याबाबत डॉ. सोनार यांनी मार्गदर्शन केले. अतिजोखमीच्या मातांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात आली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद काकडे, देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाढे, डॉ. सुमैय्या पठाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, महिला आरोग्य पर्यवेक्षिका सुनीता काळे, आरोग्य सेवक सचिन चितळे, विवेक गुंड, परिचारिका स्मिता गायकवाड, गटप्रवर्तक कल्पना शेंडे, आशासेविका आरती धाडगे, शेहनाज फकीर, विद्या बडेकर, सचिन पातारे आदी उपस्थित होते.
दर महिन्याला ९ तारखेला मोफत सेवा
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात ९ जून २०१६ रोजी करण्यात आली. या अभियानांतर्गत गर्भावस्थेच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील महिलांना दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आणि सर्वसमावेशक प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. ९ तारखेला सुट्टी असल्यास कामकाजाच्या दिवशी हे अभियान राबविले जाते.

