Sadguru Nashikkar Maharaj : अहिल्यानगर : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथे आज बुधवारी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सद्गुरु नाशिककर महाराजांच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांतून अनेक भाविकांनी अंतरवालीत हजेरी लावत परिसर अक्षरशः भक्तिमय करून टाकला.

गेल्या दोन दिवसांपासूनच भाविकांचे अंतरवालीकडे आगमन सुरू झाले होते. पहाटेपासूनच दर्शन सुरू झाली होते. ‘जय गुरुदेव’च्या अखंड जयघोषाने आणि नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी सद्गुरु नाशिककर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेत गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला.

गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी अंतरवाली येथे मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र येतात. यंदाही जिल्हाभरातून तसेच विविध भागांतून आलेल्या भक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

