Shishu Sangopan Sanstha Dindi : अहिल्यानगर : विठ्ठलनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह… या भक्तिमय वातावरणात शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी अहिल्यानगर शहरातून दिमाखात निघाली. दिंडीचे शहरभर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या संस्कार, भक्ती आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशाला भरभरून दाद दिली.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला, श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व संलग्न महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने अहिल्यानगर शहर भक्तिमय झाले. बालवाडीपासून इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी होत विठ्ठलनामाचा गजर, अभंग आणि टाळ-मृदंगाच्या साथीने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.

सविता रमेश फिरोदिया प्रशाला, वाडिया पार्क रोड येथून दिंडीला प्रारंभ झाला. दिंडी पूजन समारंभाचे उदघाटन कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी शिशु संगोपन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सेक्रेटरी र. धों. कासवा, सहसेक्रेटरी राजेश झालानी, खजिनदार ॲड. विजय मुनोत, संजय डागा, एल. के. आव्हाड, बन्सी नन्नवरे, सीमा गुंदेचा, कांचन गावडे, विनोद कटारिया, प्राचार्य दत्तात्रय कसबे, मुख्याध्यापिका योगिता गांधी, विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.

