Agriculture Solar pumps : अहिल्यानगर : राज्यातील शेतकऱ्यांच्या ऊर्जास्वावलंबनाला नवी उंची मिळाली असून महाराष्ट्राने सौर कृषिपंपांच्या स्थापनेत देशात ऐतिहासिक विक्रम नोंदविला आहे. पीएम कुसुम-बी व ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत राज्यात १० लाखांहून अधिक सौर कृषिपंप कार्यान्वित झाले असून देशातील प्रत्येक तीनपैकी दोन सौर पंप महाराष्ट्रात उभे राहिले आहेत.
देशातील एकूण १५.६२ लाख सौर कृषिपंपांपैकी तब्बल १० लाख ४७२ म्हणजेच ६४ टक्के पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभूतपूर्व कामगिरीबद्दल ऊर्जा विभाग, महावितरण आणि राज्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली राज्याने सौर ऊर्जेच्या क्षेत्रात देशात आघाडी कायम राखली आहे.
देशातील सौर कृषिपंपांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर हरियाणा (१.९० लाख), राजस्थान (१.२७ लाख), उत्तर प्रदेश (७१ हजार ५३८), झारखंड (६१ हजार ४५२) आणि गुजरात (२१ हजार ८९४) यांचा क्रमांक लागतो.
यापूर्वीही महाराष्ट्राने डिसेंबर २०२५ मध्ये एका महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करून विश्वविक्रम केला होता. या कामगिरीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.
राज्यातील सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ १० टक्के, तर अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरून सौर कृषिपंप उपलब्ध करून दिले जात आहेत. सौर पॅनेलमधून २५ वर्षे वीज निर्मिती होत असल्याने १० लाखांहून अधिक शेतकरी वीजबिलांपासून मुक्त झाले आहेत. दिवसा अखंडित वीजपुरवठा, सिंचनासाठी विश्वासार्ह ऊर्जा, विद्युत अपघातांचा धोका कमी होणे आणि शेतीपूरक उद्योगांना चालना मिळणे हे या योजनेचे प्रमुख लाभ ठरत आहेत. प्रत्येक सौर कृषिपंपाला पाच वर्षांची वॉरंटी देण्यात आली असून देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार संस्थांवर आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, नुकसान आणि चोरीविरोधी विमा संरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.