IMD weather update : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ३०-३१ मार्च रोजी ‘ऑरेंज’ तर १-२ एप्रिल रोजी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व गारपीट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना झाडाखाली उभे राहू नये व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये, तसेच विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे. वादळी हवामानात मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांच्याजवळ थांबू नये. तसेच जाहिरात फलक परिसरात जाणे टाळावे. विजा चमकत असताना उघड्यावर अडकले असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.
नदी-धरण परिसरात जाणे टाळा
पावसात धरण, नदी किंवा कालव्यांच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीट लक्षात घेऊन शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी. बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी. तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन संपर्क क्रमांक
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.