Chhatrapati Shivaji Maharaj : अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदूंचे साम्राज्य आणि हिंदवी स्वराज्य जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. शिवरायांनी समाजात स्वाभिमान, संघटन आणि राष्ट्रनिष्ठेची भावना निर्माण केली. आजच्या युवकांनी त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेत राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.

श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याच्या द्वितीय पुष्पात ते बोलत होते. यावेळी महापौर ज्योती गाडे, सुरेखा मणियार, तनया जाधव, राज जाधव यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, कोषाध्यक्ष मगनभाई पटेल, स्वागताध्यक्ष संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

