Narmada Purana Katha Chikhli : चिखली : ‘नर्मदे हर हर’च्या जयघोषाने चिखली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आणि जागृत हनुमान मंदिराचा परिसर नर्मदामाईच्या नामस्मरणाने दुमदुमला. पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या मिलिंद महाराज चवंडके यांच्या अमृतवाणीतून रंगलेल्या सात दिवसीय नर्मदा पुराण कथा सोहळ्याची श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. कथा, भजन आणि सामुदायिक महाआरतीने रंगलेल्या या सोहळ्याने भाविकांना नर्मदामाईच्या भक्तीचा अविस्मरणीय आध्यात्मिक आनंद दिला.
नर्मदा पुराणाचे रसाळ निरूपण करताना मिलिंद महाराज चवंडके यांनी ग्रंथातील कथांचे बारकावे, नर्मदा तटाचे आध्यात्मिक महत्त्व आणि पायी नर्मदा परिक्रमेतील अनुभव श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडले. विदर्भातील पहिलाच असा नर्मदा पुराण कथा सोहळा ठरल्याच्या भावना सांगता सोहळ्यात व्यक्त करण्यात आल्या. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या कथा सोहळ्याची सांगता होण्याचा योग भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरला.
नर्मदा पुराणाच्या सातव्या व समारोपाच्या पुष्पात मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदेच्या दोन्ही तटांवरील तीर्थांचे दर्शन, स्नान, पूजन, उपवास, जप व ध्यानाचे महत्त्व विशद केले. श्री मार्कंडेय ऋषींनी नर्मदा पुराणात सांगितलेल्या विविध धार्मिक विधींचा संदर्भ देत पितरांच्या मुक्तीसाठी तर्पणाचे महत्त्व आणि दानधर्माचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
‘नर्मदा पुराण आजच्या काळात नर्मदेच्या दिव्यत्वाची अनुभूती करून देणारा ग्रंथ आहे. त्यातील प्रत्येक अध्याय भक्तांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा आहे,’ असे मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले.
पायी नर्मदा परिक्रमेतील अनुभव त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि भावस्पर्शी शैलीत कथन केले. त्यांचे अनुभव ऐकताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले. त्यांच्या निरूपणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विनायक लांडे, साहेबराव आहेर, दिगंबर आहेर व बंकटसिंग शिहरे यांनी भावपूर्ण स्वरात नर्मदेची आरती सादर करून ठेक्यात भजन गायले. भजनाच्या तालावर उपस्थित भाविकांनीही उत्स्फूर्तपणे ताल धरत भक्तिरसाचा आनंद लुटला.

