Narmada Purana : चिखली : अमरकंटकच्या कुशीतून समुद्राला मिळणाऱ्या नर्मदेच्या दोन्ही तटांवर तब्बल ६० कोटी ६० हजार तीर्थे असल्याचा अद्भुत महिमा नर्मदा पुराणातून उलगडला. नर्मदामाईच्या प्रत्येक कणात तीर्थत्व आणि भक्तीची अनुभूती दडली असून, धर्मनिष्ठ भाविकांना या पवित्र तीर्थांचे दर्शन घडू शकते, असे मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले.

चिखलीतील जागृत हनुमान मंदिरातील सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्याचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. नर्मदा पुराणातील तीर्थमहिमा, पापक्षालन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व त्यांनी रसाळपणे श्रोत्यांसमोर मांडले.
मिलिंद महाराज चवंडके म्हणाले, “नर्मदा नदीची लांबी शत योजन म्हणजे साधारणतः चारशे कोसांपेक्षा अधिक असून ती अर्धा योजन रुंद विस्तारली आहे. अमरकंटक पर्वतावरील ज्वालेश्वरादी तीर्थे पितरांना तृप्ती, स्वर्ग आणि मोक्ष देणारी मानली जातात. नर्मदेच्या तटावरील चरूकेश्वर, दारूकेश्वर, व्यतिपातेश्वर, कोटीतीर्थ आदी तीर्थे पापहारी असल्याचे नर्मदा पुराणात वर्णन आहे. केदार तीर्थाजवळील पापनाशक स्वर्गद्वार ब्रह्मेश्वर नावाने प्रसिद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान,कार्यक्रमाच्या प्रारंभी कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी स्वागत केले. हभप ज्योतीताई इंगळे यांनी स्वरचित आरती सादर करून नामगजर केला. सिद्धीविनायक कपाळे, प्रशांत काळे, काशिनाथ बाहेकर, नयना काळे, प्रमिला बाहेकर, मिनाताई शिंदे, दुर्गाताई सावके आणि संध्याताई कपाळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

वृक्षारोपणालाही धार्मिक महत्त्व
नर्मदा पुराणातील दान आणि तिथीमहिमा सांगताना त्यांनी विविध पवित्र वृक्षांच्या पूजनाचे महत्त्व विशद केले. जांभूळ, कडुनिंब, तेंदू, आंबा, आवळा, वड, पिंपळ, शमी, बेल, केळी, गुलाब आदी वृक्षांचे रोपण करून त्यांचे पूजन केल्याने पुण्यप्राप्ती होते, असा उल्लेख मार्कंडेय मुनींनी नर्मदा पुराणात केल्याचे त्यांनी सांगितले.
नर्मदा परिक्रमेतील अनुभवांनी भाविक भावुक
मिलिंद महाराजांनी पायी नर्मदा परिक्रमेच्या काळात अनुभवलेले विविध प्रसंग आणि परिक्रमावासीयांच्या जीवनातील अनुभव रसाळपणे कथन केले. हे प्रसंग ऐकताना उपस्थित भाविकांचे डोळे अनेकदा पाणावले.
नर्मदेच्या भक्तिगजराने रंगला सोहळा
विनायक लांडे, साहेबराव आहेर, दिगंबर आहेर आणि बंकटसिंग शिहरे यांनी नर्मदेची आरती गाऊन ठेक्यात भजन सादर केले. भजनाच्या तालावर उपस्थित भाविकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमास सुशिलाताई वायाळ, कासाबाई पवार, कमलताई जेवूघाले, अलकाताई रिंढे, ज्योतीताई भुतेकर, मंदाताई भुतेकर, नंदाताई भराड, रेखाताई इंगळे, चंद्रकलाताई टकले यांच्यासह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
