Sunday Cleanliness Campaign : अहिल्यानगर : धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंड स्वच्छता अभियान राबवले जात आहे. आज प्रतिष्ठानने सलग ३०० व्या रविवारी स्वच्छता अभियानाचा ऐतिहासिक टप्पा गाठत भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरातून तब्बल पाच ते सहा टन कचरा हटवला. सहा वर्षे एकही रविवार न चुकवता सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘स्वच्छतेचा हा आदर्श संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे,’ असे गौरवोद्गार महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी काढले.

यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक करत, सहा वर्षे सलग ३०० रविवारी एकही दिवस खंड न पडता शहरातील मंदिरे, शाळा, क्रीडांगणे, स्मशानभूमी, सार्वजनिक ठिकाणे व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता करून समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगितले.”आज सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणारे अनेक जण दिसतात; मात्र प्रत्यक्ष श्रमदान करणारे फार कमी असतात. धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि अजय चितळे यांच्या टीमने कृतीतून समाजाला दिशा दिली आहे. प्रत्येक नागरिकाने घरापासून स्वच्छतेची सुरुवात केल्यास शहर अधिक सुंदर आणि हरित होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

