Dharmaveer Yuva Pratishthan Cleanliness Drive : अहिल्यानगर : धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंड स्वच्छता अभियान राबवले जात आहे. आज प्रतिष्ठानने सलग ३०० व्या रविवारी स्वच्छता अभियानाचा ऐतिहासिक टप्पा गाठत भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरातून तब्बल पाच ते सहा टन कचरा हटवला. सहा वर्षे एकही रविवार न चुकवता सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘स्वच्छतेचा हा आदर्श संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे,’ असे गौरवोद्गार महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी काढले.
यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक करत, सहा वर्षे सलग ३०० रविवारी एकही दिवस खंड न पडता शहरातील मंदिरे, शाळा, क्रीडांगणे, स्मशानभूमी, सार्वजनिक ठिकाणे व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता करून समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगितले.
“आज सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणारे अनेक जण दिसतात; मात्र प्रत्यक्ष श्रमदान करणारे फार कमी असतात. धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि अजय चितळे यांच्या टीमने कृतीतून समाजाला दिशा दिली आहे. प्रत्येक नागरिकाने घरापासून स्वच्छतेची सुरुवात केल्यास शहर अधिक सुंदर आणि हरित होईल,” असेही त्यांनी नमूद केले.
या अभियानात धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे, नगरसेवक निखिल वारे, ॲड. युवराज शिंदे, सतीश शिंदे, गोरख पडोळे, संजय ढोणे, उदय अनभुले, अमोल राजेभोसले, भगवान काटे, संजय सपकाळ, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अजय चितळे यांनी सांगितले की, “प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत शहरातील विविध भागांत स्वच्छता अभियान राबविले जाते. ओपन स्पेस, पुरातन मंदिरे, शाळा, क्रीडांगणे, स्मशानभूमी आणि महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसराची नियमित स्वच्छता केली जाते. या अभियानात एकही रविवार खंड पडलेला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, महापालिका प्रशासन व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे सातत्याने सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक निखिल वारे यांनी या उपक्रमाला पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाची प्रभावी कृतीशील जोड असल्याचे सांगितले, तर प्रा. भगवान काटे यांनी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सदस्य खऱ्या अर्थाने ‘स्वच्छतावीर’ असल्याचे गौरवोद्गार काढले.
‘३०० रविवार… एकही खंड नाही!’
– सलग ३०० रविवारी स्वच्छता अभियान
– सहा वर्षांपासून अखंड श्रमदान
– शहरातील मंदिरे, शाळा, क्रीडांगणे, स्मशानभूमी व – सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता
– बेलेश्वर मंदिर परिसरातून ५ ते ६ टन कचरा हटवला
– युवकांच्या वाढत्या सहभागामुळे अभियानाला नवी ऊर्जा
‘स्वच्छतेचा आदर्श घालणारे धर्मवीर युवा प्रतिष्ठान’
“सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणारे अनेक असतात; पण प्रत्यक्ष श्रमदान करणारे फार कमी असतात. धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि अजय चितळे यांच्या टीमने सलग ३०० आठवडे स्वच्छता करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. हे कार्य खऱ्या अर्थाने अनुकरणीय असून प्रत्येक नागरिकाने त्यातून प्रेरणा घ्यावी,” असे प्रतिपादन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.