Tree plantation : वाराणसी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नुकताच राज्यातील पहिल्या ‘शहरी वन’ प्रकल्पाचा भव्य प्रारंभ झाला. सुजाबाद–डोमरी परिसरातील ३५० बीघा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत एकाच वेळी ३ लाखांहून अधिक रोपांची लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या उपक्रमाची नोंद ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासाठी संबंधित टीम वाराणसीत दाखल झाली होती. विशेष म्हणजे या उपक्रमात महाराष्ट्रातील जय बाबाजी भक्त परिवारातील ६०० साधकांनी गंगा नदीच्या साक्षीने तब्बल दोन सेक्टरमध्ये वृक्षारोपण करून शहरी वन प्रकल्पात सहभाग नोंदवून शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे वाराणसी येथील शासनाने त्यांची दखल घेत त्यांचे अभिनंदन केले.

जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराजांच्या प्रेरणेने क्षेत्र काशी येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात नुकताच ओम जगद्गुरू जनशांती धर्म समारोह कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जप अनुष्ठान, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण करण्यात आले. परंतु कार्यक्रमाच्या सांगते आधी जय बाबाजी भक्त परिवारातील भक्तांनी जगद्गुरू शांतीगिरी महाराजांच्या प्रेरणेने झाडे लावा, झाडे जगवा हे ब्रीद जोपासत हजारो वृक्षांची लागवड करून शासनाच्या उपक्रमात दमदार कामगिरी केली आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश त्रिवेदी, नागेश्वर महाराज, अविरमुक्तेश्वर महाराज, डी.सी. गायकवाड, संजय शिंदे, मुकुंद पिंगळे, पोपट सोनवणे, संजय पवार, कडू जगताप, साहेबराव आहेर, मच्छिंद्र कराळे, तुकाराम भोये, अण्णासाहेब गायकवाड, सुमन पैठणकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ६० घाटांच्या स्वरूपात संपूर्ण वनक्षेत्र विकसित करण्यात आले असून प्रत्येक सेक्टरला काशीतील प्रसिद्ध घाटांची नावे देण्यात आली आहेत. यात दशाश्वमेध, ललिता, मानमंदिर, शीतला, गायघाट आदी घाटांचा समावेश आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये सुमारे पाच हजार रोपे लावली जाणार असून संपूर्ण परिसर ‘मिनी काशी’सारखा हिरवागार दिसणार आहे.

