Weather Update : अहिल्यानगर जिल्ह्यात १२ ते १४ मे दरम्यान तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी पिणे, उन्हात जाणे टाळणे व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांनी काय करावे?
तहान लागली नसली तरी दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घ्यावे. तसेच ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबूपाणी यांचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना छत्री किंवा टोपीचा वापर करावा. शक्य असल्यास ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हापासून बचावासाठी हलके, पातळ व सुती कपडे वापरावेत. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे असून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेची माहिती रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातून नियमित घ्यावी.
नागरिकांनी काय करू नये?
दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत. तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. गडद, घट्ट व जाड कपडे घालू नयेत. दारू, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आहार व शिळे अन्न खाऊ नये. शक्यतो उन्हाच्या वेळेत स्वयंपाक टाळावा व स्वयंपाकघरात हवा खेळती राहील यासाठी दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात. उष्माघाताची लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
