Nath Sampradaya : अहिल्यानगर : “नाथ संप्रदायाचे मूळ स्वरूप अत्यंत उदात्त असून ते भगवान शिव यांच्यापासून सुरू झालेली एक प्राचीन भारतीय शैव आणि योग परंपरा आहे. हा संप्रदाय सर्वव्यापी आणि योगधारणेवर उभा असलेला संप्रदाय असून महाराष्ट्रात तो भक्तीमार्गाच्या वाटेने अधिक दृढपणे रुळला आहे,” असे प्रतिपादन मिलिंद महाराज चवंडके यांनी केले.

भिंगार येथील नेहरू चौकात श्री कानिफनाथ अस्थाना देवस्थानतर्फे आयोजित श्री नवनाथ महात्म्य निरूपण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी दीपक नायकू यांनी स्वागत केले. सागर लालबोंद्रे यांनी परिचय करून दिला. सचिन बिडकर व रामभाऊ पांढरे यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला. कारभारी भीम लालबोंद्रे यांनीही त्यांचा गौरव केला.
मिलिंद महाराज पुढे म्हणाले, “नाथ संप्रदायातील प्रमुख सिद्धांची ओळख अनेकदा चमत्कार व सिद्धीच्या सामर्थ्यामुळे लोकमानसात झाली असली, तरी या संप्रदायाचे मूळ स्वरूप अत्यंत उदात्त आहे. “पिंडी ते ब्रह्मांडी” हे नाथपंथाचे प्रधान सूत्र असून “सोहम” ही प्रमुख साधना आहे. नाथपंथीय साधना, तत्त्वज्ञान व आचारधर्माचा अभ्यास केल्यास भारतातील अनेक पंथ व साधनामार्गाशी नाथ संप्रदायाचा संबंध आढळतो, असे त्यांनी स्पष्ट केले. नाथ संप्रदायाचे दर्शन मठ-मंदिरे, आखाडे, अस्थाने, झुंडी व यात्रांमधून प्रकर्षाने घडते. समाजाच्या उद्धाराची तळमळ या संप्रदायात दिसते. विशेष म्हणजे स्त्रियांना मंत्रोपदेश देऊन सन्मानाने नाथ संप्रदायात सामावून घेण्याची परंपरा या पंथाने जपली आहे. नाथपंथीय आचारामध्ये शिव-शक्ती समावेशन, पिंड-ब्रह्मांडाचे ऐक्य, कुंडलिनी जागृती, ध्यान व समाधी यांना महत्त्व आहे. महाराष्ट्रातील नाथपंथ हा पुढे भगवान श्रीकृष्णाच्या म्हणजेच विठ्ठलाच्या उपासनेत एकरूप झाला. त्यामुळे नाथपंथाचा वैष्णव धर्माशी असलेला प्राचीन संदर्भ समोर येतो. मच्छिंद्रनाथांना भगवान विष्णूचा अवतार मानले गेले आहे.
नाथांनी चमत्काराला प्राधान्य न देता सदाचाराचे महत्त्व वाढवण्याचे कार्य केले. परम श्रद्धेने नवनाथांना हाक मारल्यास ते निश्चित साहाय्य करतात, हा विश्वास श्रद्धावंत आजही अनुभवतात. म्हणूनच गुढीपाडवा सोहळ्यासाठी नाथक्षेत्री लाखो भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या ताण-तणावाच्या काळात नाथ संप्रदाय समाजाला शाश्वत आधार देतो. मन:शांती, टिकणारे समाधान आणि आनंद देत संकटांवर मात करण्याची प्रेरणा नाथ भक्ती देते, असा विश्वास मिलिंद महाराजांनी व्यक्त केला.
दरम्यान, नवनाथांच्या अद्भूत जन्मकथा व त्यांच्या प्रभावी कार्याचे प्रसंग गूढार्थासह ऐकताना भाविक मंत्रमुग्ध झाले होते. सलग पाच दिवस दररोज सुमारे तीन तास चाललेले श्री नवनाथ महात्म्य निरूपण भाविकांच्या मनामनात नाथ भक्तीचा महिमा रुजवणारे ठरले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी खंडू फिरोदे, सागर लालबोंद्रे, योगेश नायकू, सचिन बिडकर, दिपक नायकू, अमोल नायकू, शाम काळे, वैभव लालबोंद्रे, अभिषेक नायकू, श्रीकांत दळवी, आनंद नायकू, संदीप मालवंडे, गणेश दळवी, रुपेश लालबोंद्रे, अक्षय गिरमे आदींसह परिसरातील महिला व बाल-गोपाळांनी अथक परिश्रम घेतले. सामुदायिक महाआरती व महाप्रसादाने भक्तीपूर्ण वातावरणात सोहळ्याची सांगता करण्यात आली.
नाथ संप्रदायाचा प्रभाव जनमानसावर कायम
नाथ संप्रदायाचा प्रभाव भारतीय जनमानसावर कायम राहिला असून हठयोग, ध्यानयोग, राजयोग, लययोग व कुंडलिनी जागृती यांना नाथपंथात विशेष स्थान आहे. सिंधू संस्कृतीच्या उदयापासून या परंपरेचे अस्तित्व दिसते. ज्ञान, धर्म, कर्म व भक्ती या चारही वाटा नाथ संप्रदायात एकत्र येतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास स्वामी, संत निळोबाराय यांनी नाथ संप्रदायाचा उल्लेख मोठ्या आदराने केला असल्याचेही चवंडके महाराज यांनी नमूद केले.
भारत, नेपाळच्या भूभागात नाथपंथांचे अनेक मठ
काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते नेपाळ या विस्तीर्ण भूभागात नाथपंथाचे अनेक मठ, मंदिरे व आखाडे विखुरलेले आहेत. मंत्रयोग, हठयोग, राजयोग, लययोग यांच्या साहाय्याने नाथयोगी देहाला शिवरूप बनवतो. कुंडलिनी शक्तीच्या उत्थापनाला नाथ संप्रदायाने अधिक महत्त्व दिले आहे. यंत्रसाधना, शाबरी मंत्र, तंत्रशाबरी कवच ही साधना आजही श्रद्धेने केली जाते. नवनाथांच्या तपसामर्थ्याने भरलेले मंत्र हे सिद्ध मंत्रच असल्याचे मिलिंद महाराज यांनी सांगितले.
